मुंबई : बिझनेस व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'एमबीए'च्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. ही परीक्षा घेणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयानं एमबीए सीईटी परीक्षेत आणि त्याच्या निकालात गोंधळ घातल्याचं समोर येतंय. यामुळे परीक्षेला बसलेल्या तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना फटका बसतोय.
जास्त मार्क मिळालेला विद्यार्थी १०व्या क्रमांकावर आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळालेला विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर असं कधी तुम्ही ऐकलंय का? नाही ना... पण हा प्रताप करुन दाखवलाय राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयानं... अर्थात डिटीईनं...
बॅचलर्स इन इंजिनिअरींग 'डिस्टिंक्शन'ने पास झालेल्या आकांक्षा उमरगेकरनं एमबीएची प्रवेशपूर्व परीक्षा दिली. चार टप्प्यात ही ऑनलाईन परीक्षा पार पडली. पहिल्या फेरीत परीक्षा देताना आकांक्षाला १५० मार्क मिळाले. तिचं पर्सेंटाइल होतं ९६.९६ टक्के... आणि चौथ्या फेरीत याच परीक्षेला बसलेल्या अन्य विद्यार्थ्याला १३५ मार्क मिळालेत, पण त्याचे पर्सेंटाइल ९९.२ टक्के होतं.
कमी मार्क असणाऱ्यांना जास्त पर्सेंटाईल... हा घोटाळा कसा झाला? त्याचं श्रेय जातं डीटीईच्या निकाल पद्धतीला... डीटीईनं प्रश्नपत्रिकेत केलेल्या चुका निस्तरण्यासाठी रिझल्ट लावताना जे वेगवेगळे फॉर्म्युले वापरले, त्यामुळं पहिल्या फेरीत परीक्षेला बसलेल्या १४,६१८ विद्यार्थ्यांचा निकाल लागला. अधिक मार्क मिळवूनही त्यांना हव्या त्या एमबीए कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाहीय.
नाशिकला ही परीक्षा दिलेल्या प्राजक्ता चव्हाणसोबतही असाच गोंधळ झालाय. तिलाही १५० मार्क आहेत पण तिच्यासोबत परीक्षा दिलेल्या आणि १५० मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिच्याहून अधिक पर्सेंटाईल आहे.
बिझनेस क्षेत्रात सामान्य मुलांनाही उंच भरारी घेता यावी यासाठी एमबीए ही महत्त्वाची पायरी आहे. पण सरकारी यंत्रणेच्या या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.