रत्नागिरी : शहराजवळच्या बसणी गावात ग्रामपंचायतीची जुनी इमारत पाडून त्यावर कोणतीही मंजुरी न घेता नवीन इमारत उभी राहिली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे मान्यता नसताना याला निधी मिळत नसल्याने या इमारतीसाठीचा खर्च चक्क ग्रामपंचायत फंडातून केला गेला आहे. त्यामुळे बसणी ग्रामपंचायतीचा अजब कारभार पुढे आलाय.
बसणी गावातली ९० टक्के पूर्ण झालेली ग्रामपंचायतीची इमारत सध्या वादात सापडली आहे. या इमारतीला कुठलीही प्रशासकीय मान्यता नाही. मंजुरी नसतानाही शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याकडून इमारतीचं भूमीपूजनही झालं होतं. विशेष म्हणजे याआधीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी इमारतीच्या बांधकामासाठीचा दोन लाखांचा पहिला निधी चक्क ग्रामपंचायत फंडातून दिला. नवी कार्यकारिणी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी निधी का, येत नाही याची शहानिशा करायला गेल्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला.
नवीन कार्यकारिणीनं यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार दिली. तसंच यासंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना पालकमंत्री रवींद्र वायकरांनी दिल्या आहेत. ग्रामपंचायतीतलं गौडबंगाल समोर आलंय पण आता तरी माजी सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.