पुणे : दारु पिऊन गाडी चालवणा-या 'तळीरामां'बरोबरच त्यांच्यासोबत गाडीत बसलेल्या प्रवाशांनाही, आता पोलीस कारवाईला सामोरं जावं लागत आहे.
दारु पिऊन गाडी चालवायला मूक संमती दिल्याबद्दल, अशा प्रकारे पुण्यात दोन दिवसांत ४५ जणांवर कारवाई केली गेली. मोटार परिवहन कायद्यातल्या १८८ नुसार ही कारवाई केली जात आहे.
याखेरीज पुणे वाहतूक पोलिसांनी तळीरामांवर कारवाई करण्यासाठी शहरात २८ ठिकाणी नाकांबदी केलीय. ब्रेथ एनलायझरच्या मदतीनं या ठिकाणी तपासणी केली जात आहे. कोर्टाने तळीराम वाहन चालकांचे वाहन चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले आहे.
त्याशिवाय आता वाहनांचे रजिस्ट्रेशनच रद्द करण्यात येत असल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे दंडाची पावती फाडून नव्या वर्षाची सुरुवात करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.