ठाणे: हॅकिंग... आताशी ही बाब कॉमन झालीय आणि या हॅकिंगनं अनेकांना गंडवलंय सुद्धा. आपलं नेट अकाऊंट, बँकिंग अकाऊंट हॅक होऊन रक्कम चोरीला गेल्याचं अनेकदा ऐकलं असेल. पण व्हॉट्स अॅप हॅक करून गंडा घालणं हे कसं शक्य आहे. हे सत्य आहे...
ठाण्यातील एका तरुणानं एका तरुणीचं व्हॉट्स अॅप हॅक करून तिला ५० हजारांचा गंडा घातलाय. पोलीस आता हॅकर्सचा शोध घेतायेत.
काय घडलं नेमकं...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ठाण्यात आयसीआयसीआय बँकेत काम करणारी पल्लवी तिर्लोटकरला तिच्यासोबत काम करणाऱ्या निशा नावाच्या मैत्रिणीचा मेसेज आला. एका तरुणानं माझे आक्षेपार्ह फोटो काढले आहेत आणि मी मोठ्या संकटात सापडली आहे. तो आता मला ब्लॅकमेल करत आहे. शिवाय मी फोनवर बोलू शकत नाही, असं या मेसेजमध्ये लिहिलं होतं."
हॅकरनं पल्लवीची मैत्रिण निशाचं व्हॉट्सअॅप हॅक केलं. त्यानंतर निशा बनून पल्लवीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. फोटोंच्या मोबदल्यात तरुणानं निशाकडून पैसे मागिल्याचं मेसेजमध्ये लिहिलं होतं. त्यासाठी पल्लवीला भिवंडीच्या ब्रजेश्वरी कॉम्पलेक्समध्ये बोलावलं.
मैत्रिण संकटात असल्याचं कळल्यानंतर पल्लवीही तिला मदत करण्यासाठी तयार झाली. हॅकरनं पल्लवीला ठाणे स्टेशनवरुन एसटी बस पकडून ब्रजेश्वरीला येण्यासाठी सांगितलं. पल्लवी तिथं पोहोचली असता त्यानं स्वत:चं नाव साहिल असल्याचं सांगितलं. मला निशानं पाठवलं असून ती मोठ्या संकटात आहे, असं साहिलनं पल्लवीला सांगितलं.
आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचं पल्लवीनं साहिलला सांगितलं. पण त्यानं आर्जव करत गळ्यातील सोन्याची चेन देण्यासाठी पल्लवीला विनंती केली. पल्लवीनंही फारसा विचार न करता, मैत्रिणीच्या मदतीसाठी चेन काढून साहिलला दिली. त्यानंतर सोन्याची चेन घेऊन साहिल पसार झाला. या घटनेनंतर जेव्हा पल्लवी निशासोबत बोलली, तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर पल्लवी आणि निशानं ठाणे पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.