ग्रामीण भागात घटली बालकांची संख्या!

नुकत्याच झालेल्या जनगणनेत काही धक्कादायक आकडेवारी समोर येतेय. या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या दहा वर्षांत राज्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या तब्बल ३ लाख ४५ हजारांनी घटली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2013, 11:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नुकत्याच झालेल्या जनगणनेत काही धक्कादायक आकडेवारी समोर येतेय. या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या दहा वर्षांत राज्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या तब्बल ३ लाख ४५ हजारांनी घटली आहे.
२०११ च्या जनगणनेत बालकांची संख्या १.३३ कोटी आहे. २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत यामध्ये बालकांची संख्या ३ लाख ४५ हजारांनी कमी झाली असून हे प्रमाण २.५२ टक्के इतके आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बालकांमध्ये मुलांची संख्या घटण्याचे प्रमाण ७.५ टक्के तर मुलींच्या संख्येत १० टक्क्यांनी घट झाली आहे. दुसऱ्या बाजूला शहरी भागात बालकांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलांच्या संख्येत ८ टक्के तर मुलींच्या संख्येत ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुले आणि मुलींच्या संख्येचे सर्वाधिक प्रमाण ठाणे जिल्ह्यात असून ते १० टक्क्यांवर आहे. याशिवाय पुणे आणि औरंगाबादमध्येही बालकांची संख्या वाढली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बालकांची संख्या खूपच कमी असून या दोन्ही जिल्ह्यांत हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. `अपेक्षा` या बालकांसाठी काम करत असलेल्या संस्थेने नोंदविलेल्या निरीक्षणामध्ये ग्रामीण भागातील कोणत्याही गावात शून्य ते सहा या वयोगटातील साधारण: एक किंवा दोनच मुले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण यापूर्वी ९१३ होते. त्यामध्ये घट होऊन या वयोगटातील हे प्रमाण ८९४ इतके खाली आले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.