नवी दिल्ली / पुणे : फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
अनेक वेळा वादात सापडलेली फास्ट फूड चेन मॅकडोनल्ड पुन्हा एका नव्या वादात अडकण्याची चिन्ह आहे. आठवड्याभरापूर्वी पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मॅकडोनल्डने ८ वर्षांच्या एका गरीब मुलाला आपल्या दुकानातून हाकलून दिलं.
गेल्या शनिवारी मुंबईतली शाहीना अत्तरवाला नावाची युवती एका कामानिमित्त पुण्यात गेली होती. तेव्हा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला ती मॅकडोनल्ड दुकानात गेली होती. तिथे रस्त्यावर राहणा-या गरीब मुलाने तिच्याकडे खाण्याची मागणी केली. तेव्हा शाहीनाने दया येऊन त्या मुलाला मॅकडोनल्डमध्ये फंटा फ्लोट देऊ केलं. त्याला घेऊन शाहीनाने मॅकडोनल्डमध्ये पाऊल ठेवल्यावर लगेचच स्टाफने त्या मुलाला हाकलून दिलं.
मॅकडोनल्ड्समधल्या वातावरणात हा मुलगा फीट नाही असा दुजाभाव या स्टाफचा होता. या मुलाला हाकलून देताना त्याच्या कॉलरला धरून रखवालदाराने बाहेर काढलं. आठ वर्षांच्या या गरीब मुलाला अशा रितीने दुजाभाव दाखवण्याचा अधिकार मॅकडोनल्ड स्टाफला कोणी दिला असा प्रश्न या प्रकरणात निर्माण होतोय.
या प्रकारानंतर शाहीनाने मॅकडोनल्डकडे आपली या प्रकरणाची नाराजी व्यक्त करणारी तक्रार नोंदवली. त्यावर उत्तर देताना सुरक्षेच्या कारणामुळे या आठ वर्षांच्या मुलाला बाहेर काढल्याचं उत्तर मॅकडोनल्डकडून देण्यात आलं असं शाहीनाने म्हटलंय.
या प्रकरणी खुद्द मुख्यमंत्र्यांनाही दखल घ्यावी लागलीय.. या प्रकरणाची माहिती घेऊनच उत्तर देऊ असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.