रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेने आपली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, नगराध्यपदाचा उमेदावर जाहीर केलेला नाही. तर राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांना थेट नगराध्यपक्षासाठी उमेदवार जाहीर केलेय.
शिवसेनेची उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीनं माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांना उमेदवारी दिली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच त्यांची पत्नी यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला.
अद्याप अन्य राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे 24-6चा प्रस्ताव ठेवला आहे. पण हा प्रस्ताव काँग्रेसला मान्य होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आघाडी होण्याची शक्यता धुसर आहे. राष्ट्रवादीने मोठी खेळी करत उमेश शेट्ये यांनाच नगराध्यपदाची उमेदवारी केल्याने काँग्रेसला आघाडी आधीच शह देण्याच प्रयत्न केलाय.
मात्र, अर्ज भरत असताना अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. निवडणूक आयोगानं ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची सोय केली. याचा मात्र बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. अर्ज नीट अपलो़डच होत नसल्याचा दावा उमेदवारांनी केलाय त्यामुळे या सर्व यंत्रणेचा बोजवारा उडालाय.