'आरएसएस'ची अ.भा. प्रतिनिधी सभा शुक्रवारपासून...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅलेंडरमधली अतिशय महत्वाची समजली जाणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शुक्रवारापासून नागपूरला सुरु होणार आहे. अनेक कारणांमुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. 

Updated: Mar 12, 2015, 12:03 PM IST
'आरएसएस'ची अ.भा. प्रतिनिधी सभा शुक्रवारपासून... title=

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅलेंडरमधली अतिशय महत्वाची समजली जाणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शुक्रवारापासून नागपूरला सुरु होणार आहे. अनेक कारणांमुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. 

१३ मार्चपासून नागपुरात सुरू होणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा अनेक दृष्टीनं महत्त्त्वाची ठरणार आहे. केंद्रात स्वबळावर भाजप सत्तेत आल्यावर आणि नरेंद्र मोदींच्या रूपानं संघाचा स्वयंसेवक पंतप्रधान झाल्यानंतर होणाऱ्या या बैठकीला महत्व आलंय. संघाची स्थापना जरी १९२५ मध्ये झाली असली तरीही प्रतिनिधी सभेची सुरुवात १९५० मध्ये झाली. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्रसेविका समिती आणि भाजपसह
संघ परिवारातल्या ३४ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत भाग घेतात आणि संपूर्ण वर्षाचा लेखा-जोखा या बैठकीत मांडला जातो. प्रतिनिधी सभेची बैठक जरी दरवर्षी होत असली तरीही दर तिसऱ्या वर्षी होणारी बैठक नागपूरलाच होते. 

देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर १९७५ मध्ये आणि १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद ढाचा पडल्यानंतर संघावर आलेल्या बंदीमुळे या दोन वेळेला
प्रतिनिधी सभेची बैठक झाली नाही. तरुण आणि वयाने कमी असलेल्यांना संधी आणि महत्वाची जबाबदारी देण्याच्या संघाच्या धोरणामुळे या बैठकीत या दृष्टीने महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नुकतेच नागपूरला आले होते आणि त्यांनी या भेटी दरम्यान त्यांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकूणच या बैठकीचे दूरगामी परिणाम संघ परिवारावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.