पुणे : कथित अनागोंदी आणि इन्कम टॅक्सचे छापे यामुळंच गेल्या सहा-सात वर्षांत शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या वार्षिक हिशेबाला मान्यताही घेण्यात आलेली नाही. संस्थेच्या नियामक मंडळातले सदस्यच या अनियमिततेविरोधात आरोप करतायत...
शिक्षण प्रसारक मंडळी म्हणजे पुण्यातली प्रथितयश संस्था… संस्थेचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष... मात्र केवळ जुनी आहे म्हणून ही संस्था मोठी नाहीय. तर खरंच संस्थेचं कर्तृत्व देखील तसंच आहे. आजमितीला संस्थेच्या चाळीस शैक्षणिक शाखा राज्यभरात कार्यरत आहेत.
पुणे, मुंबई, सोलापूर, चिपळूणपासून अगदी बेंगळुरूपर्यंत विस्तार झालाय. पुण्यातील एस. पी. कॉलेज, नु. म. वि. प्रशाला, सोलापूरची हरिभाई देवकरण प्रशाला, मुंबईतील रुईया आणि पोद्दार कॉलेज, वेलिंगकर इन्स्टिट्यूट आणि नारळकर इन्स्टीट्यूट या संस्थेच्या काही प्रसिद्ध शिक्षण संस्था… अनेक कर्तृत्ववान आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तींनी शिक्षण प्रसारक मंडळींचं नेतृत्व केलं… सध्या संस्थेचे कारभारी आहेत ते अभय दाढे आणि अनंत माटे.
त्यांच्या कर्तृत्वाबद्दल संस्थेतली माजी पदाधिकारी बी. व्ही. राडकर म्हणाले, की
छाप्यानंतर इन्कम टॅक्स विभागानं शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व सुविधा बंद केल्या. इन्कम टॅक्सच्या 80G, 12A, 10 (23C) नियमानुसार संस्थेला टॅक्स भरावा लागत नव्हता. शिवाय संस्थेला देणगी देणाऱ्यांनाही करमाफी मिळायची. आता या सुविधा बंद झाल्यात. शिवाय संस्थेला इन्कम टॅक्सही भरावा लागतोय. इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळणार नसल्यानं देणगीदारांनी देखील पाठ फिरवली. त्याचा फटका शिक्षण प्रसारक मंडळीला बसतोय, असे नियामक मंडळातील सदस्यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील रुईया आणि पोद्दार ही कॉलेजेस आणि व्यावसायिक कोर्सेस चालवणारी वेलिंगकर इन्स्टिट्यूट या संस्था म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळीच्या प्रमुख संस्था. या संस्थांमधील मॅनेजमेंट कोट्याच्या जागांमधूनही संस्थेला चांगला आर्थिक हातभार लागायचा. याचा पुरावा म्हणजे २००८ आणि २०१० मधले इन्कम टॅक्स विभागाचे छापे, असा दावा नियामक मंडळ सदस्यांनी केलाय. त्यामुळेच २००८ नंतर संस्थेच्या उत्पन्नाचा स्त्रोत आटल्याचा आरोप माजी पदाधिकारी बी. व्ही. राडकर करतायत...
प्रशासकीय पातळीवरही संस्थेमध्ये कथित अनागोंदी असून, गेल्या सहा वर्षांपासून संस्थेची सर्वसाधारण सभा झालेली नाही. त्यामुळं वार्षिक ताळेबंदालाही औपचारिक मान्यता मिळालेली नाही, असं नियामक मंडळ सदस्यांचं म्हणणं आहे. नियामक मंडळाच्या सभा देखील नियमित होत नाहीत. आणि झाल्याच तर, अचानकपणे सोलापूर, चिपळूण अशा दूरवरच्या ठिकाणी होतात, असा आरोप नियामक मंडळ सदस्य जयंत किराड यांनी केला आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीविरोधात सध्या विविध कोर्टात पन्नासेक केसेस सुरु आहेत, असं संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दाढे यांनीच अनौपचारिक चर्चेत सांगितलं. इन्कम टॅक्स, धर्मादाय आयुक्त अशा ठिकाणी देखील दावे सुरु आहेत. पोलिसात गुन्हे दाखल झालेयत. त्यात अभय दाढे आणि अनंत माटे आरोपी आहेत. त्यामुळं खटले लढण्यातच कारभाऱ्यांची मोठी शक्ती खर्च होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.