मुंबई : घोटाळेबाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला खाली खेचा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटीमध्ये केलंय. तर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेय. नवी मुंबईत काँग्रेसचे पदाधिकारी सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला थोडी तरी लाज असेल तर ते विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं उद्धव यांनी म्हटलंय. तसंच बाळासाहेबांना त्रास दिलेल्यांना शिवसेनेत स्थान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. शिवाय येवल्यात प्रचार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय.
विधानसभा निवडणुकांची हवा आता चांगलीच तापू लागली आहे. नाशिकचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून. त्यांनी इच्छुक म्हणून आपला अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे पाठवला आहे. तर भुजबळांचे सुपूत्र पंकज भुजबळही नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
नवी मुंबईतील काँग्रेसचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राज्य उत्पादन शुल्कमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना शह देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं समजतं. काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, माजी उपमहापौर अनिल कौशिक, नगरसेवक संतोष शेट्टी, रमाकांत म्हात्रे आणि शिवराम पाटील यांनी वांद्रे परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं सांगितलं जातंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.