बसच्या पासचे पैसेही नव्हते म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या!

लातूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बसच्या पासला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. स्वाती विठ्ठलराव पिटले असं त्या मयत मुलीचे नाव आहे. दुष्काळामुळे शेतकरी असलेल्या वडिलांची परिस्थिती बिकट बनली होती. त्या अस्वस्थतेतूनच आता शेतकऱ्यांची मुले ही आता आत्महत्येला कवटाळू लागल्याचे भीषण स्थिती लातूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. 

Updated: Oct 25, 2015, 02:43 PM IST
बसच्या पासचे पैसेही नव्हते म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या!  title=

शशिकांत पाटील, लातूर : लातूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बसच्या पासला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. स्वाती विठ्ठलराव पिटले असं त्या मयत मुलीचे नाव आहे. दुष्काळामुळे शेतकरी असलेल्या वडिलांची परिस्थिती बिकट बनली होती. त्या अस्वस्थतेतूनच आता शेतकऱ्यांची मुले ही आता आत्महत्येला कवटाळू लागल्याचे भीषण स्थिती लातूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. 

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील जढाळा विठ्ठलराव पिटले या अल्पभूधारक शेतकऱ्याची परिस्थिती दुष्काळामुळे बेताची झाली होती. स्वाती आणि रेखा या मुलींच्या शिक्षण ही परवडत नव्हते. अकरावीत शिकत असलेल्या स्वातीला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यातच बसच्या पाससाठी आईने उसने पैसे आणून दिले. त्यामुळे कौटुंबिक अस्वस्थतेमुळे स्वातीनं टोकाचं पाऊल उचललं... या सगळ्यातून स्वत:ची आणि कुटुंबीयांची सुटका करण्यासाठी 15 ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून स्वातीनं आत्महत्येचा मार्ग पत्करला. 

आत्महत्ये अगोदर स्वातीनं लिहिलेलं पत्र मन हेलावून टाकणारं आहे. तिच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी हे पत्र तिच्या कुटुंबीयांना घरी सापडलं. 

नापिकी आणि दुष्काळामुळे आई-वडिलांचे कष्ट मातीमोल होताना तिने अनेकदा पहिले होतं. घरावर असलेल्या कर्जाच्या डोंगराखाली तिचा चिमुकला जीव गुदमरत होता. वडिलांनी ट्रॅक्टर, टेम्पो, मळणी यंत्र यांच्या खरेदीबरोबरच शेतीच्या मशागतीसाठी काढलेलं वीस लाखांच्या जवळपास असलेलं कर्ज तिला स्वस्थ बसू देत नव्हतं.

बँक आणि फायनान्सचे हप्ते फेडताना वडिलांचा होणारा अपमान तिच्या जिव्हारी लागला होता. त्यातच शेतातल्या एका एकरातला टोमॅटो प्लॉट पाण्याअभावी वाळला. घरात खायचेही वांदे झाले. बहिणीचं भरमसाठ हुंडा देऊन यावर्षी करायचं ठरवलेलं लग्न पुन्हा पुढच्या वर्षावर गेलं. या सगळ्या हाल-अपेष्टांना कंटाळून स्वातीने विषारी औषध घेतलं. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

आपल्या पत्रात स्वातीनं महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी पास काढण्यासाठीही पैसे नसल्याचं म्हटलंय. उसने आणलेल्या पैशांतून काढलेला तीन नोव्हेंबरपर्यंतचा पास स्वातीकडे होता... ती गेली मात्र पासची मुदत अजूनही बाकी आहे... 

तिने याची कल्पना कुणालाही दिली असती तर इतरां प्रमाणेच तिलाही कॉलेजने एसटी पास सहजपणे  मिळवून दिला असता, असं स्वातीच्या कॉलेजच्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे. 

याप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल झालाय. परंतु, एकूणच या भीषण दुष्काळात आता शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचं आणि इतर कुटुंबीयांचे समुपदेशन करणे आता गरजेचं बनल्याचं या घटनेतून स्पष्ट दिसतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.