www.24taas.com, मुंबई
शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर उद्या पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीत दादरमध्ये सर्व जागा पराभूत झाल्यानंतर दादरचा गड ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न चालवलेत. त्यासाठी सरवणकरांसारखा महत्त्वाचा नेता शिवसेनेनं पुन्हा आपल्याकडं ओढलाय. उद्या मातोश्रीवर सरवणकर अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करतील.
शिवसेनेतले लढाऊ नेते अशी ख्याती असलेल्या सरवणकरांना शिवसेनेची उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली मात्र मनसेच्या झंझावातापुढे त्यांना अपयश आलं. महापालिका निवडणुकीतही मनसेनं सगळ्या जागा जिंकल्या. त्यामुळं बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी लढाऊ व्यक्तीमत्व हवं यासाठी सरवणकरांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं. दादर-माहिम हा पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करु अशी प्रतिक्रिया सरवणकर यांनी झी 24 तासशी फोनवरून बोलताना दिली.