कामातांचा आघाडीत खोडा

का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोध मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.

Updated: Jan 6, 2012, 08:14 PM IST

www.24taas.com, मुंबई


पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी केली नाही, त्यामुळे मुंबईत त्यांच्याशी आघाडी का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोध मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.

 

आघाडी नको या अशा आशयाचे पत्र मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना पाठवून आघाडीत खोडा घालण्याचा प्रकार केला आहे. आघाडी झाली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक होईल. जिंकणाऱ्या जागा काँग्रेसला का द्याव्यात, असा सवालही गुरूदास कामत यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.

 

आघाडी करण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी गुरूदास कामत यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाही. आता त्यांनी आपला निषेध सोनिया गांधी, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी यांनी पत्र लिहून व्यक्त केला आहे.

 

गेल्या १२ वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी राज्यात सत्तेवर आहेत. मात्र. गेल्या २० वर्षांपासून मुंबईवर शिवसेना-भाजपचे सरकार आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकूण ३६ टक्के मतदान झाले होते तर शिवसेना- भाजप २५ टक्के मते मिळवून सत्तेत गेली होती. त्यामुळे हे गणित लक्षात घेता दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून जोरबैठका सुरू आहेत.

 

मात्र, आजच्या पत्रामुळे या आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न कामतांनी केला आहे.
दरम्यान, आघाडीसाठी आम्ही काँग्रेसच्या मागे लागलो नाही, त्यांना आघाडी करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. नाही करायची तर तसे त्यांनी सांगू द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते मदन बाफना यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.