मुंबईकरांना आज अजिबात पाणी नाही...

मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे.

Updated: May 7, 2012, 10:39 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे. विक्रोळी भागात आज सकाळी १० ते उद्या सकाळी या वेळात १०० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. विक्रोळीशिवाय नाहूर आणि कांजुरमार्ग या भागातही पाणी कपात करण्यात आली आहे.

 

त्यामुळं या भागातल्या नागरिकांनी रविवारीच घरी पाणी भरुन ठेवलं आहे. चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, मुलुंड, भांडुप या उपनगरांमध्येही ४० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर मुंबई शहर आणि काही पश्चिम उपनगरांमध्ये २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तीन हजार मिलीमीटरच्या दोन पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू असल्यामुळं पाणी कपात करण्यात आल्याचं महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चेंबूर ते विक्रोळी आणि विक्रोळी ते मुलुंड अशी जोडली जाणार आहे. या कामानंतर भातसा तलावातून मुंबईत येणारं पाणी हे जास्त दाबानं येऊन मुंबईकरांना जास्त पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा आहे.