www.24taas.com, मुंबई
फेब्रुवारी महिन्यातच राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईचं संकट ओढवले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे तब्बल सात जिल्ह्यांत टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याचं दुर्भिक्ष यावर्षी खूपच लवकर ओढवलंय. त्यामुळे मे आणि जून महिन्यांत आणखी भीषण परिस्थिती ओढवू शकते अशी चिन्हं असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ठोबळे यांनी दिली.
सध्या राज्यात पाऊस चांगला झाला, असूनही फेब्रुवारी-मार्चमध्येच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. २४ फेब्रवारी रोजी संपलेल्या आठवड्यात २१२ गावे आणि १२०३ वाड्यांना ९५ शासकीय आणि १३३ खासगी अशा एकूण २३० टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी टंचाईचे गावे जास्त आणि शासकीय टँकर कमी असे गणित असल्याने आता ही मलाई खासगी टँकर चालकांना खायला मिळणार आहे. यासाठी सरकारने निविदाही मागविल्या आहेत, अशी माहिती ढोबळे यांनी दिली.
पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर आता सरकारने उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे. म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सरकारतर्फे करण्यात येत आहे. राज्यातील शहरातील परिस्थिती चांगली असली तरी ग्रामीण भागात सध्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. गुरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर असल्याने सरकारने अनेक ठिकाणी चारा डेपो सुरू केले आहेत. परंतु त्याचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नसल्याची नाराजी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यक्त केली होती.