वामनराव पै यांचा जीवनप्रवास

जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. एक नजर टाकूयात सदगुरु वामनराव पै यांच्या जीवनप्रवासावर.

Updated: May 30, 2012, 12:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

जीवनविद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे बोधवाक्य जनसामान्यांच्या मनावर बिंबवलं. एक नजर टाकूयात सदगुरु वामनराव पै यांच्या जीवनप्रवासावर.

 

'तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे तत्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहचवून सदगुरु वामनराव पै यांनी लाखो अनुयायांना सुखाचा मार्ग दाखवला.. लाखो जणांच्या धावपळीच्या आयुष्यात शांती, समाधान प्राप्त व्हावं यासाठी वामनराव पैंनी त्यांचं आयुष्य वेचलं.. आणि अखेरच्या क्षणापर्यंत याच ध्यासानं ते कार्यरत राहिले.. २१ ऑक्टोबर १९२३ रोजी वामनराव पै यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.. १९४४ साली त्यांनी मुंबईच्या विद्यापीठातून पदवी घेतली.. त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीही केली.. मात्र अध्यात्माकडेच त्यांचा कल राहिला.. या काळात चिंचपोकळीत कामगार केंद्रात त्यांची प्रवचने होत असत.. त्यानंतर काळाचौकीत हनुमान मंदिरातही त्यांची प्रवचने होत.. त्याचवेळी त्यांनी श्रोत्यांच्या साथीनं नाम संप्रदाय मंडळाचा संकल्प सोडला.. त्याचेच १९५५  साली जीवन विद्या मिशन झाले आणि तेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठरले..

 

सरकारच्या अर्थ विभागातून उपसचिव पदावरुन ते सेवानिवृत्त झाल्यानंतर, जीवन विद्या मिशनचा हा वेलू त्यांनी गगनावरी नेला.. त्यांच्या  सांगितलेल्या साध्यासोप्या तत्वज्ञानाचा अंगिकार करत लाखो लोकांनी आपल्या जीवनात चांगला बदल घ़डवून आणला. अज्ञान, अंधश्रद्धा आणि निराशावादाच्या अंधारात चाचपडणा-या लाखो दु:खी जीवांना सुख, शांती, समाधान आणि समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचं काम केलं. त्यांनी अनेकांना व्यसनमुक्त करण्यात हातभार लावला. तसंच अनेकांच्या कुटुंबातील कलहही त्यांनी सोडविले. वामनरावांचे काम हे प्रामुख्यानं कामगार आणि तळागाळातल्या वर्गासाठी होते.

 

जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या. ही विद्या सर्वांनाच मिळावी म्हणून रात्रंदिवस झटून वामनराव पै यांनी २५ पुस्तके लिहली, प्रवचने केली. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाचीही चांगली साथ लाभली.. जीवनविद्येचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी गेल्याच महिन्यात कर्जतजवळ जीवन विद्या ज्ञानपीठाची स्थापना केली होती. उद्घाटनाच्या सोहळ्याला ते स्वत: हजर होते. आणि तोच त्यांच्या जीवनातला शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. त्यावेळीही हजारो शिष्यांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला होता. सदगुरु वामनराव पैंचं निधन झालं असलं तरी त्यांनी दिलेली जीवन विद्या आणि त्यांनी पेरलेलं जीवन विद्या मिशनचं बीज येणा-या पिढ्यांना मानवतेचा संदेश देतच राहील.

 

लाखोंच्या जीवनात जीवन विद्येचा प्रकाश फुलवणा-या सदगुरु वामनराव पै यांना 'झी २४ तास'ची आदरांजली..