मुंबई : एकेकाळी सर्व मुंबईकरांची दुधाची गरज भागवणारी आरे डेअरी सध्या शेवटच्या घटका मोजताना दिसतेय. सरकारी नियमांमुळं बाजारभावानुसार दूध खरेदी करणं आरे डेअरीला शक्य नसल्यानं दिवसेंदिवस आरेकडील दूध संकलन कमी होत चाललंय. त्यामुळं गेली पाच दशकांपासून असलेल्या ग्राहकांना दूध पुरवठा करणं आरेला शक्य होत नाही.
मुंबईकरांना कमी दरात दूध पुरवठा करण्याच्या हेतूनं राज्य सरकारनं सुरु केलेली आरे डेअरी सध्या शेवटच्या घटका मोजतेय. ‘दूध महापूर योजने’मुळं 1995 पर्यंत आरे डेअरी 12 लाख लीटर दूध संकलन करत होती. पण, सरकारच्या सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळं आरेकडील दूध संकलन कमी होत गेलं.
गेल्या 2-3 महिन्यात तर आरेचे दूध संकलन एक लाख लीटरवरून 20 हजार लीटरवर आलंय. म्हणजे क्षमतेच्या केवळ दीड टक्के दूध संकलन होतंय. दूध संकलन कमी होण्यामागे दरातील फरक हा महत्वाचा घटक आहे. सहकारी आणि खाजगी डेअरी गायीचे दूध 27 ते 28 रुपये लीटरनं दूध उत्पादकांकडून खरेदी करत असताना आरेचा दर मात्र केवळ 23 रुपये 35 पैसे आहे.
मुंबईतल्या 41 मोठ्या रुग्णालयांची 50 हजार लीटर दुधाची मागणी असताना सध्या आरे डेअरी केवळ 10 हजार लीटरच दूध पुरवठा करत आहे. ग्राहक असूनही त्यांना दूधपुरवठा करणं आरे डेअरीला अशक्य झालंय. दूध संकलन वाढीसाठी राज्य सरकार कुठलेही प्रयत्न करत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
वरळी इथं सीफेसला लागून असलेली मोक्याची 23 एकर जागा, कुर्ला येथील 27 एकर जागा आणि गोरेगाव येथील सुमारे 3500 एकर जागा आरे डेअरीकडं आहे. हजारो कोटी रुपये किंमतीच्या या जागेसाठीच आरे डेअरी बंद करण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप, आरे डेअरी कर्मचारी संघटनेचे नेते पांडुरंग तोरस्कर यांनी केलाय.
नियमांच्या बंधनात अडकवून आरे डेअरीचा गळा सरकारकडून घोटला जातोय. त्यामुळं सरकारनं प्रयत्न न केल्यास मुंबईकरांच्या मनामनात बसलेला आरे ब्रॅण्ड काही दिवसांतच नामशेष झालेला पहायला मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.