मुंबई : आदर्श इमारतीमध्ये थोरामोठ्यांचे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे इमारत पाडली जाईल तेव्हाच खरं. आदर्श ही सर्वसामान्यांची इमारत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे आईच्या पाठीत नाही तर तिच्या कुशीत वार करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्रयवीर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
बहुचर्चित आणि वादग्रस्त आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजप खासदार किरीट सोमय्यांनी स्वागत केलंय.
मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं संरक्षण खात्याला दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी, असंही या आदेशात म्हटलंय.
पर्यावरण खात्याने सेझ नियमांतर्गत आदर्श इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. या प्रकरणी संरक्षण विभागानं चौकशी करावी आणि दोषी असलेल्या मंत्री, राजकारणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेशही हायकोर्टानं दिलेत.
न्यायमूर्ती खेमकर आणि न्यायमूर्ती मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तर, चुकीच्या पद्धतीने आदर्श इमारतीचे काम सुरु होते हे लक्षात आल्यावरही सरंक्षण विभागाने कारवाई का केली नाही, अशा प्रश्न न्यायालयानं केला. तसंच या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरंक्षण विभाग आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
७ प्रतिवाद्यांना ६ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी १२ आठवड्यांची मुदत देण्यात आलीये. सोसायटीच्या सदस्यांनीही या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय.