अजित मांढरे, मुंबई : सामान्य नागरिकांसोबत पोलिसांची वर्तवणूक हे अव्यवहारिक असून त्यामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. वेळेतच पोलिसांनी आपल्या आचरणात सुधारणा आणली नाही तर विचारही केला नसेल, अशा शिक्षेला सामोरे जावं लागेल... असं धारदार परीपत्रकच मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी काढलंय.
या परीपत्रकामुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हादरलेत तर सामान्य मुंबईकरांनी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या या परिपत्रकाचे स्वागत केलंय.
काय म्हटलंय या परिपत्रकात...
- मुंबई पोलिसांनो शिस्तीने वागा
- नागरिकांना पोलीस ठाण्यात नीट वागणूक द्या
- पोलिसांच्या गैरवर्तणूकीमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झालीय
- पोलिसांनो सुधारा नाही तर कारवाईला सामोरे जा
गणेशोत्सवादरम्यान लालबाग येथे एका तरुणीला पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण आणि त्यानंतर पोलिसांवर उठलेली टीकेची झोड... हे काय कमी होतं ते अंधेरी पोलीस स्टेशन मध्ये एका जोडप्याला पोलीस ठाण्यातचं करण्यात आलेली मारहाण... यांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा इतकी मलीन झालीय की, ती सुधारण्याची आता वेळ आलीय. याची प्रचिती मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना झाल्याने त्यांनी आता पोलिसांकरता सुधारण्याचं परिपत्रकच काढलंय.
पोलीस आयुक्तांची निरीक्षणं...
- पोलीस दलातील पोलिसांना शिस्त लावणे आणि त्यांच्यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे
- सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरिकांप्रती पोलिसांची आक्षेर्पाह वागणूक आणि अन्यायकारक बळाचा वापर वाढत आहे
- पोलिसांचे सर्व नागरिकांशी अव्यावसायिक तसेच कायद्याचे उल्लंघन करणारे वर्तन दिसून येते
- यामुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होऊन पोलीस दल हे व्यावसायिकतेचा गंध नसलेले व धाकदपटशाचे वापर करणारे आहे, असे चित्र जनमानसांत उभे राहिले आहे
अशी निरीक्षणे स्वत: मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी नोंदवली असून, मुंबई पोलीस दलातील पोलीसांना शिस्तीची आणि नियंत्रणाची गरज असल्याने पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी हे परीपत्रकच काढलंय. फक्त पत्रक काढून अहमद जावेद यांनी आपल्यावरील जबाबदारी ढकलली नाही तर, यापुढे ज्या पोलीस ठाण्यातील पोलीस नागरीकांशी गैरवर्तणूक करतील अशा पोलीसांवर तर कारवाई होईलच पण, त्यांच्या वरीष्ठांनादेखील गैर वर्तणूकीवर नियंत्रण ठेवतां न आल्याचा ठपका ठेवून कारवाई केली जाईल, असेही आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी काढलेत.
पोलिसांना खरच आपल्या वर्तणुकीत बदल करणे गरजेचे आहे असं म्हणत नागरिकांनीही मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी काढलेल्या पत्रकाचं स्वागतच ही केलंय.
तसं पाहिलं तर सामान्य माणसाला पोलिसांकडून मिळणारी वागणूक ही योग्य नसेल तर ती बदलणे गरजेचं आहेच... पण, सणासुदीच्या दिवसांतही १८ - १८ तास काम करणाऱ्या पोलिसांवर असलेला कामाचा असलेला ताण आणि त्यांची ढासळलेली मानसिकता याकडेही प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.