मुंबई : लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तिढा सुटला असून भरघोस पगारवाढ होणार आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार असून पहिल्या आणि तसऱ्या शनिवारी बॅंक पूर्णवेळ सुरु राहणार आहे.
बॅंक कर्मचारी बुधवारपासून चार दिवस संपावर जाणार होते. मात्र त्यापूर्वीच बँक व्यवस्थापनाने पगारवाढीची मागणी मान्य करून त्यांना खूशखबर दिली आहे. संप टळल्याने ग्राहकांना देखील दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक बँकांमधील कर्मचारी, अधिकारी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना व बँक व्यवस्थापनाची संघटना 'इंडियन बँक्स असोसिएशन'च्या प्रतिनिधींची सोमवारी मुंबईत चर्चा झाली. यापूर्वी शुक्रवारी नवी दिल्लीत मुख्य कामगार आयुक्तांपुढे झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यामुळे कर्मचारी संघटना संपावर ठाम होत्या.
बँक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीलाच २५ टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र व्यवस्थापन प्रतिनिधींनी ११.५ टक्के वेतनवाढीपासून चर्चेला सुरुवात केली. चर्चेअंती १५ टक्के वेतनवाढ मंजूर करण्यात आली. ही वेतनवाढ १ नोव्हेंबर २०१२ पासून लागू होणार आहे. यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांना ४,७२५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.