www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलिसांनी नुकताच मुंबईतील ‘एलोरा’ या बारवर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी बारमधील कर्मचाऱ्यांसह बारबालांनाही जबर मारहाण केली आणि याच मारहाणीमुळे एका बारबालेचा मृत्यू झालाय, असा आरोप बारमालकानं केलाय.
पोलिसांनी बारमध्ये घुसून बारमधील कर्माचारी आणि बारबालांना आपल्या ताब्यात घेतलं होतं. यादरम्यान पोलिसांनी त्यांना जबर मारहाणही केली. हा पोलिसांचा तमाशा बारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानं पोलीसांनी हे सीसीटीव्ही फुटेजही आपल्या ताब्यात घेतलंय, असं बारमालकानं म्हटलंय. पुरावा नष्ट करण्यासाठी पोलिसांकडून हे फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता बारमालकानं व्यक्त केलीय.
दरम्यान, तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते.
छापा मारणाऱ्या समाजसेवा शाखेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या सर्व प्रकरणाचा तपास आता स्थानिक कस्तुरबा मार्ग पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांना समाजसेवा शाखेची कोणतीही चूक निदर्शनास आलेली नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.