मुंबई : बिहारमध्ये तिस-यांदा सत्तेवर आल्यावर नीतिश कुमारांनी धडाकेबाज निर्णय घेणार असल्याची चुणूक दाखवून दिलीय. नीतिशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय जाहीर केलाय. यामुळं मात्र महाराष्ट्रात कधी दारूबंदी होणार याची चर्चा सुरू झालीय.
बिमारू राज्य नाही तर विकसीत राज्य असा लौकीक बिहारला मिळवून द्यायचा असेल तर दारू हद्दपार करणं गरजेचं आहे हे नीतिशकुमार जाणतात. त्यासाठी पहिलं पाऊल त्यांनी उचललंय. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी जाहीर करून टाकली. त्यामुळं 2016 पासून बिहारमध्ये दारू मिळणार नाही.
नीतिश यांच्या या निर्णय़ाचं सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्रात दारूबंदी चळवळीला जुना इतिहास आहे. मात्र दारूबंदीला राज्य पातळीवर यश आलेलं नाही. नीतिश कुमार यांनी बिहारमध्ये हा निर्णय घेण्याचं दाखवलेलं धाडस महाराष्ट्रात कधी दाखवलं जाणार असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी विचारला आहे.
अभय बंग यांच्या या मागणीमुळं राज्यपातळीवर दारूबंदीची जोरदार चर्चा सुरू झालीय. सत्तेत असलेल्या शिवसेनेनं दारूबंदीला थेट पाठिंबा जाहीर केला असला तरी सरकारच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनंही राज्यात दारूबंदीला सहमती दर्शवली. तर काँग्रेसनं आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केलीय.
मात्र सध्या राज्याला मद्यातून मिळणार उत्पादन शुल्क प्रचंड आहे... त्याला पर्याय उपलब्ध होत नाही तोवर राज्यात दारूबंदी शक्य नाही असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय.
राज्यात दारूबंदीसाठी विविध पातळ्यावरून लढा दिला जात आहे. राज्य़ात चंद्रपूर जिल्ह्यात अभय बंग, पारोमिता गोस्वामी यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे दारूबंदी शक्य झाली आहे..मात्र आता बिहारच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रात कधी दारूबंदी होणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.