मुंबई : काँग्रेस आघाडीतील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने तिढा कायम आहे. हा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे.
वारंवार राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडणा-या काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची एकमुखी भूमिका मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सर्वच मंत्री आणि प्रमुख नेत्यांनी घेतलीय. राष्ट्रवादीची दादागिरी सहन करू नका असा आग्रह या बैठकीत सर्वांनीच धरला. तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घ्यायची नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसनं घेतलीय.
यासंदर्भात आता येत्या 19 आणि 20 ऑगस्टला दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठका होणार आहेत. 19 ऑगस्टला शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अहमद पटेल आणि ए. के. अँटोनी या नेत्यांची चर्चा होणार आहे. तर 20 ऑगस्टच्या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस सर्व २८८ मतदारसंघांमधून इच्छुकांचे अर्ज मागवणार असल्याचं माणिकराव ठाकरेंनी सांगितलंय. तर दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाची बोलणी होणार असल्याचं राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.