ज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार

मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.

Updated: Feb 6, 2015, 06:34 PM IST
ज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार title=

मुंबई : मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.

आपल्या कार्यकाळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करण्याची ग्वाहीदेखील यावेळी तावडे यांनी दिली. ज्येष्ठ साहित्यिक आणि कोसलाकार भालचंद्र नेमाडेंना साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. झानपीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात नेमाडेंना ज्ञानपीठ जाहीर होणं म्हणजे मराठी साहित्याचा हा सर्वात मोठा गौरव मानण्यात येतोय.

कोसला, झूल, जरीला, हूल, बिढार आणि हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या आहेत. तर टीका स्वयंवर सारखा ग्रंथ लिहून साहित्य समीक्षेतही त्यांनी मोठं योगदान दिलंय़. त्यांच्या टीका स्वयंवर या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. नेमाडेंनी त्यांच्या कादंब-यांमधून देशीवाद मांडून मराठी साहित्याला एक नवा आयाम दिला.

भालचंद्र नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना, मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीचे पुढचे तीन भाग लवकरच प्रकाशित होणार असून, त्यानंतर आपण कादंबरी लिहिणं बंद करणार आहोत. आणि कविता लिहिणार असल्याची घोषणा नेमाडेंनी 'झी २४ तास'शी बोलताना केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.