मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार निवडण्याचा अभिनव पायंडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा गुडाळला आहे. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या शिफारसीवर उमेदवाराचे तिकीटाचे भवितव्य ठरणार आहे.
अन्य राजकीय पक्षांप्रमाणे मनसेच्या कार्यालयातही महापालिका निवडणुकीची लगबग दिसू लागली आहे. उमेदवार ठरविण्यासाठी पक्षाचे नेते स्थानिक कार्यकर्त्यांची मते विचारात घेत आहेत. पण हे दृश्य जरा खटकणारंच आहे. खरंतर गेल्या महापालिका निवडणुकीत लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार ठरवण्याची अभिनव पद्धत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवलंबली होती. या संकल्पनेचं कौतुकही झालं होतं. मात्र यंदा रेल्वे इंजीनाचा भरकटलेला प्रवास आणि गेल्या काही निवड़णुकांमधे पक्षाची झालेली पिछेहाट पाहाता, यंदा महापालिका तिकिटासाठी लेखी परीक्षा रद्द गुंडाळण्याची वेळ आली.
पाच वर्षांपूर्वी मनसेची राज्यात जोरदार हवा होती. २००९ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. त्यावेळी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन राज ठाकरेंनी सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
मुंबई महापालिकेचे कामकाज, महाराष्ट्राचा इतिहास, नगरसेवकाची कर्तव्य तसेच सामान्य ज्ञान याची चाचणी या परीक्षेतून घेण्यात आली होती. मनसे मुंबई महापालिेकेत २७ नगरसेवक निवडून आले होते. पुण्यात विरोधी पक्षनेते पद तर नाशिक, खेडमध्ये मनसेची सत्ता स्थापन झाली होती. मात्र खेड वळगळता यंदा परीस्थिती बिकट आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला उतरती कळा लागली आहे. यंदा परीक्षेऐवजी पक्षाच्या नवनिर्माणचेच आव्हानं राज ठाकरे यांना पेलावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या परीक्षापेक्षा पक्षाच्या अस्तित्वाचीच परीक्षा आहे, अशी चर्चा आहे.