www.24taas.com, मुंबई
दिवाळीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी बँकांकडून विशेष सवलती देण्यात येतात. मात्र या सवलती खरंच फायदेशीर असतात का?
दिवाळी जवळ आल्यावर स्वस्त सोनं विकण्याचा दावा तर सगळेच करतात. मात्र, त्यात सत्य काही वेगळंच असतं. बँका ग्राहकांना काय ऑफर्स देतात आणि त्यातील नेमका खरेपणा किती? हे ओळखणं गरजेचं आहे. बँकांच्या ऑफर्सवर नजर टाकल्यास आयसीआयसीआय बँकेची नाणी खरेदी केल्यानंतर आठ टक्क्यापर्यंत, कोटक बँक, पंजाब नॅशनल बँक आणि सेंट्रल बँक पाच टक्क्यांपर्यंत सवलत सध्या देताना दिसत आहेत. मात्र, खरं पाहता या बँकांचं सोनं सवलतीनंतरही बाजारभावापेक्षा महागच आहे. बँकेतून सोनं खरेदी केल्यानंतर बँक बाजारभावापेक्षा अधिक प्रीमिअम घेते ग्राहकांचं हे सर्वात मोठं नुकसान आहे. मात्र, ही नाणी ९९.९९ टक्के शुद्ध मानली जातात.
दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही पोस्ट खातंही सोन्याची नाणी विकत आहे. पोस्ट ऑफिस ग्राहकांना सात टक्के सवलत देतंय. मात्र, सात टक्क्यांच्या दरात सोनं दिल्यास त्या सोन्याचा भाव ३३ हजारांपर्यंत जातो. ब्रोकिंग आणि बुलियन कंपन्याही सणांच्या काळात सोन्याची विक्री करताना दिसत आहेत. मोतीलाल ओसवाल आणि रिद्धी सिद्धी बुलियनमध्ये लाईव्ह मार्केट रेटवर ऑनलाईन सोनं खरेदी करण्याची सुविधा ग्राहकांना पुरविण्यात येतेय. मात्र, त्यासाठी ग्राहकांना एक ग्रॅम सोनं खरेदी करणं गरजेचं आहे. ग्राहक यानंतर त्यावर सोनंही खरेदी करू शकतात. मोतीलाल ओसवालमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी कमीतकमी १० ग्रॅम सोनं खरेदी करणं गरजेचं आहे. तर रिद्धी सिद्धी बुलियनमध्ये ग्राहक एक ग्रॅम सोनंही प्रत्यक्षात खरेदी करू शकतात.
दरवर्षी दिवाळीआधी सोन्याचे भाव चांगलेच वाढतात. मात्र, यंदा सोन्याचे भाव वाढूनही नंतर कमी झालेत आणि सध्या ते स्थिर आहेत.