मुंबई : सुसज्ज, आधुनिक आणि निसर्गसंपन्न ग्रीन पार्क मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.
व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा
तसेच जुहू विमानतळाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी यावेळी मांडला. पठाणकोटसारखा भीषण अतिरेकी हल्ला येथे होऊ नये यासाठी तातडीने जुहू विमानतळाला पुरेसे संरक्षण देण्याची मागणीही केली. त्याचवेळी मुंबईतील जुहू विमानतळाची सुरक्षा अत्यंत धोक्यात असून खासगी सुरक्षारक्षकांबरोबर केवळ दोन पोलीस त्याची सुरक्षा सांभाळत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या वाढीव सुरक्षेबाबत तातडीने केंद्र सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला वाढीव सुरक्षा देण्याबाबत कळविण्यात येईल असे सांगितले. रेसकोर्सच्या लीजची मुदत संपत आहे. तेथे जागतिक दर्जाचे ग्रीन पार्क उभारण्यात यावे. येथे मुंबईकरांना मनोरंजनासाठी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक भव्य जागा येथेच उपलब्ध होऊ शकेल, असे आदित्य ठाकरे म्हणालेत.