मुंबई : मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या 23 वर्षीय नेहा नाईक या मराठमोळ्या तरुणीला व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची संधी मिळतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेटही ती यावेळी घेणार आहे.
ओबामा पती-पत्नीनं जगभरातील 12 विकलांग व्यक्तींनी भोजनाचं आमंत्रण दिलंय. हे 12 व्यक्ती असे लोक आहेत ज्यांनी स्वत:च्या शारीरिक अक्षमतेला मात देऊन जगभरात नाव कमावलंय. इतरांसाठी हे लोक प्रेरणा ठरलेत. या 12 जणांमध्ये गोरेगावात राहणारी अॅथलिट नेहा नाईक हिचाही समावेश आहे.
नेहा 31 जुलै रोजी अमेरिकेच्या विशेष भोजन समारंभात सहभागी होणार आहे. नेहानं 100 मीटर आणि शॉट-पूट इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. 2013 मध्ये कोरियात झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक दरम्यान नेहाला भारताची अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. याच दरम्यान तिनं अपंगांच्या समस्यांबद्दल तसंच स्वत:च्या संघर्षमय जीवनाबद्दल भाषण केलं होतं. या भाषणामुळे तिला 'इंटरनॅशनल ग्लोबल मॅसेंजर' म्हणूनही निवडण्यात आलं.
गोरेगावचे रहिवासी असलेल्या आशा आणि प्रभाकर नाईक दाम्पत्यांची नेहा ही एकुलती एक मुलगी. नेहा सामान्य मुलांप्रमाणेच होती. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षी तिला ताप आला आणि त्याचा परिणाम तिच्या मेंदूवर झाला. सामान्य मुलांच्या शाळेत शिकणारी नेहा अभ्यासात मागे पडली. हे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला गोरेगावच्या देवराजी गुंडेजा पुनर्वास विशेष शाळेमध्ये प्रवेश घेतला.
अभ्यासाव्यतिरिक्त नेहाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांच्या विकास या शाळेत झाला. अॅथलेटिक्समध्ये तिला विशेष गती होती. तिची हीच खेळाची आवड पालकांनी जोपासली. त्याचेच फलित म्हणून या खेळात सहभागी होण्यासोबत ती स्वतःचे विचारही मोकळेपणाने मांडू लागली. स्वतःला धीटपणे व्यक्त करू लागली.
महत्त्वाचं म्हणजे, नेहाला ओबामांना भेटण्याची संधी आपलं वाढदिवसाचं गिफ्ट असल्याचं वाटतंय. 27 जुलै रोजी नेहाचा वाढदिवस आहे. विशेष भोजन समारंभात नेहाचे मार्गदर्शक जोनिता रॉड्रिक्स हेदेखील तिच्यासोबत उपस्थित असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.