मुंबई : हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर आता मुंबईतल्या मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात 'एल व्याड' (LVAD) ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आलीय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
मुंबईत व्यवसाय करणारे अरविंद दोशी टीबी झाल्यानं सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळले होते. तपासणीअंती त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नसल्याचं समोर आलं. हृदय प्रत्यारोपणाचा निर्णय फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी घेतला. पण, त्यासाठी शरिरातले इतर अवयव सक्षम असायला हवेत. पण अरविंद यांच्याबाबतीत तसं नव्हतं.
मग 'एल व्याड' म्हणजेच 'लेफ्ट वेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाईस' हा पर्याय डॉक्टरांनी निवडला. हे डिव्हाईस हृदय प्रत्यारोपणात बॅटरीच्या सहाय्यानं रक्क पम्प करतं. मग हे रक्त शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहचतं. पण त्यासाठी 18 तासांचा बॅकअप असलेली 'एल व्याड' मशीन सोबत ठेवावी लागते. महाराष्ट्रात ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आलीय, अशी माहिती फोर्टीस हॉस्पिटलचे झोनल चेअर पर्सन डॉ नारायणी यांनी दिली.
वीस दिवसांपूर्वी अरविंद यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आलीय. महिन्याभरात ते चालू फिरू शकतील. त्यामुळं त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय.
ज्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शक्य नाही अशांसाठी 'एल व्याड' संजिवनी ठरलीय. पण सध्या तरी ही शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे.