www.24taas.com, मुंबई
राज्यात आजपासून माघी गणेशोत्सव साजरा होतोय. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजाननाची माघ महिन्यात येणारी ही गणेशचतुर्थी...
मुंबईमध्ये कुंभारवाडा, फाऊंटन, गिरगाव, परळ, घाटकोपर, विलेपार्ले तसंच उपनगरांतही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. माघी गणेशोत्सवानिमित्त सकाळपासूनच प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केलीय. तर मुंबईतल्या चारकोप भागात लालबागच्या राजाची प्रतिकृती तयार करण्यात आलीय. मूर्तीकार संतोष कांबळी यांनी लालबागच्या राजाची हुबेहूब मूर्ती बनवलीय. चारकोपमधील ही मूर्ती १० फुटांची आहे. तिची सजावट, दागिने हुबेहुब लालबागच्या राजासारखे आहेत. चारकोपमधला हा माघी गणेशोत्सव आजपासून १९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
तर माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक न्यास मंदिरातर्फे संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळतोय. सोमवारी शंकर महादेवन यांनी आपल्या गायनानं श्रोत्यांची मने जिंकली होती. मंगळवारी रवी मोरे, पं. उल्हास कशाबकर, बासरीवादक हरीश कुलकर्णी यांनी आपली कला सादर केली. अनेक कलाकारांनी आपली कला सादर करुन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.