नारायण राणेंना प्रदेशाध्यक्षपदाची `ऑफर`

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाची माळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे आहेत. राणे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यास काँग्रेसश्रेष्ठी विचार करत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासोबत मंत्रिपद कायम राहावे, असा आग्रह राणे यांनी धरल्याचे वृत्त आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 17, 2012, 09:27 AM IST

www.24taas.com,मुंबई
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाची माळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे आहेत. राणे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यास काँग्रेसश्रेष्ठी विचार करत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासोबत मंत्रिपद कायम राहावे, असा आग्रह राणे यांनी धरल्याचे वृत्त आहे.
राज्य मंत्रिमंडळ फेरबदल करताना महसूल मंत्रिपदासाठी राणे यांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. राणे यांच्यासोबतच विद्यमान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनीही महसूल मंत्रिपदाच्या दिशेने हालचाली सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या महसूलमंत्रिपदाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समाधानी आहेत. त्यामुळे त्यांना त्या पदावरून हटवू नये, असे मुख्यमंत्र्यांना वाटत आहे.
मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराला मुख्यमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार राज्यातल्या राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. नारायण राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटीला सुरवात करत राजकीय फेरबदलाची हवा निर्माण केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेसला आक्रमक रणनीतीचे नेतृत्व हवे आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री या दोन प्रमुख नेतृत्वाचा पक्षश्रेष्ठींनी गंभीरपणे विचार सुरू केला आहे. नारायण राणे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याचा एक पर्याय यामधून समोर आल्याने त्यावर विचारमंथन सुरू आहे. राणे यांना याबाबत पक्षश्रेष्ठींच्या गोटातून विचारणा झाल्याचा दावा दिल्लीतल्या एका कॉंग्रेस नेत्याने केला.
राणे यांनी दिल्लीत सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, राणे यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिलेला नसला तरी, त्यांना मंत्रिपद कायम हवे आहे. त्यातच मुख्यमंत्री बदलण्याची पक्षश्रेष्ठींची मानसिकता नाही. म्हणून राणे यांनी महसूलमंत्रिपदाची मागणी केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना महसूलमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री राजी नसल्याचे सांगितले जाते.