महायुतीच्या घटक पक्षांची संघर्षाची भूमिका

सत्तेत वाटा मिळत नसलेल्या भाजपाबरोबरच्या महायुतीतील पक्षांनी आता उघडपणे भाजपाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. वारंवार भाजपाकडून केवळ पोकळ आश्वासन मिळत असल्याने या घटकपक्षांनी यापूर्वी अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता भाजपाला धडा शिकवण्यासाठी हे पक्ष भाजपाविरोधात संघर्ष करायला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दुसरीकडे शिवसेनेचीही भाजपाविरोधातील नाराजी वाढत चालली आहे.

Updated: Oct 5, 2015, 04:18 PM IST
महायुतीच्या घटक पक्षांची संघर्षाची भूमिका  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सत्तेत वाटा मिळत नसलेल्या भाजपाबरोबरच्या महायुतीतील पक्षांनी आता उघडपणे भाजपाविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. वारंवार भाजपाकडून केवळ पोकळ आश्वासन मिळत असल्याने या घटकपक्षांनी यापूर्वी अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता भाजपाला धडा शिकवण्यासाठी हे पक्ष भाजपाविरोधात संघर्ष करायला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दुसरीकडे शिवसेनेचीही भाजपाविरोधातील नाराजी वाढत चालली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेबरोबची युती तोडल्यानंतर भाजपाने चार पक्षांना आपल्या बरोबर घेतले. या पक्षांना बरोबर घेताना त्यांना सत्तेत वाटा देण्याचं लेखी आश्वासन भाजपाने दिलं होतं. मात्र आता सरकार येऊन वर्ष होत आलं तरी घटकपक्षांना दिलेलं आश्वासन भाजपाने पाळलं नाही. 

मंत्रिमंडळात स्थान आणि महामंडळांवरील नियुक्त्या करण्यासाठी मागील वर्षभरात या पक्षांच्या नेत्यांनी वारंवार मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांच्या पदरात आश्वासनांपलिकडे काहीच पडलं नाही. वारंवार मिळणाऱ्या आश्वासनाने आता भाजपाच्या  मित्रपक्षांची सहनशीलता संपत आली आहे. 

घटक पक्षांनी त्यामुळे आता भाजपाविरोधात आणि सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेतली असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. याला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दुजोरा दिला आहे. 

भाजपाचे हे घटकपक्ष आता केवळ नाराजी व्यक्त करून थांबले नाहीत. याती महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत 40 उमेदवार उभे करण्याची घोषणा करून भाजपाला एकप्रकारे आव्हान दिले आहे. 

सत्तेत वाटा मिळावा म्हणून भाजपाच्या मित्रपक्षांनी आतापर्यंत अनेकवेळा अल्टीमेटर दिला आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम भाजपावर झालेला दिसला नाही. त्यामुळेच वर्षपूर्ती होत आली तरी भाजपा घटकपक्षांना दिलेले आश्वासन पाळायला तयार नाही.

वर्षपूर्ती करणाऱ्या भाजपावर घटक पक्ष जसे नाराज आहेत, तसेच सत्तेत एकत्र असलेली शिवसेनाही नाराज आहे. त्यामुळे कल्याण-डोंबवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला या सगळ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.