www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला...म्हणजेच मकर संक्रात आजच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जातेय. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे यालाच मकर संक्रात असं म्हणतात.
वीजेचे दिवे घरोघरी लागायच्या आधी लोक सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत काम करायचे. त्यामुळे दिवसाचा कालावधी वाढण्याच्या क्रियेला महत्त्व प्राप्त झालं. मकर संक्रांतीला तिळगूळ वाटून गोड बोलण्याचं आवाहन केलं जातं. मात्र सध्याच्या काळात तिळगूळ घ्या आणि नीट बोला असं म्हणण्याची गरज आहे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटलंय.
मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (१३ जानेवारी), संक्रांत (१४ जानेवारी) आणि किंक्रांती (१५ जानेवारी) अशी नावे आहेत. संक्रांतीला आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाण वाटून `तिळगुळ घ्या आणि गोड बोला` असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्रजी भाषा महिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.