मुंबई : मुंबईत 'दो फूल आणि दो माली' असा धक्कादायक प्रकार पुढं आलाय. 11 वर्षांच्या दोघा मुलींवर हक्क सांगण्यासाठी दोन-दोन महिला पुढं आल्यात. या मुली नेमक्या कुणाच्या यावरून या दोघा महिलांमध्ये वाद सुरू झालाय.
रुबिना शेख आणि रफीक शेख या दाम्पत्याला 11 वर्षांपूर्वी कचरापेटीत दोन मुली सापडल्या. मात्र, इतक्या वर्षानंतर या मुलींची खरी आई असल्याचा दावा करत एका महिलेननं या दोन्ही मुलींवर आपला हक्क असल्याचं म्हटलंय. त्यामुळे शेख कुटुंबाला मात्र जबरदस्त धक्का बसलाय.
एकीनं या मुलींना जन्म दिल्यानंतर कचऱ्याच्या ढिगात फेकून दिलं... तर दुसरीनं त्या मुलींचं लाडाकोडानं संगोपन केलं. रुबिना आणि रफीकनं कौसर आणि केसर या दोन मुलींना खाऊपिऊ घालून मोठं केलं... त्यांचे लाड पुरवले... आता मात्र त्या दुरावणार म्हणून शेख कुटुंबियांचे रडून रडून हाल झालेत.
या मुलींची खरी आई असल्याचा दावा करणाऱ्या महिलेनंही तिची व्यथा मांडलीय. नवरा दारूडा असल्यानं मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना सोडलं होतं, असं या महिलेनं म्हटलंय.
त्यामुळे, पोलिसांसमोर मात्र मोठा पेच निर्माण झालाय. पोलिसांनी हे प्रकरण आता चाईल्ड वेल्फेअर कमिटीकडे निर्णयासाठी सुपूर्द केलंय. तोपर्यंत या दोघा मुलींना रिमांड होममध्ये पाठवलंय, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिलीय.
कचऱ्यात सापडलेल्या मुली आज मोकळ्या वातावरणात वाढतायत, शिकतायत... त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेताना याचा विचार होणं आवश्यक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.