मुंबई : काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली... आणि अर्थातच सगळ्यांच्या नजरा या अनोख्या प्रचाराकडे वळल्या.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातला पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. नारायण राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस या निवडणुकीत उतरलीय... त्यामुळे, राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
'तसं पवार पोटनिवडणुकीत प्रचाराला जात नाहीत, मात्र माझ्यावरील प्रेमापोटी ते आलेत' असं राणेंनी यावेळी म्हटलंय.
तर, 'नारायण राणेंची मूर्ती लहान, पण कीर्ती महान...' असल्याचं सांगत पवारांनीही मग राणेंवर स्तुतीसुमनं उधळली. 'बाळासाहेबांना राणेंचं कर्तृत्व कळलं म्हणून त्यांनी मनोहर जोशींना बाजूला करून राणेंना मुख्यमंत्री केलं... बाळासाहेबांना जे कळलं ते सध्याच्या पिढीला किती समजतं, ते पाहायचं' असा टोला पवारांनी 'मातोश्री'च्याच अंगणात मारलाय.
दरम्यान, शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर काल प्रथमच देवेंद्र फडणवीसांनी मातोश्रीला भेट दिली.. पोटनिवडणूकीत तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी ते वांद्र्यात आले होते.. प्रचारानंतर उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणावरुन ते मातोश्रीवर दाखल झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.