www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.
बऱ्याच वर्षांपासून मेट्रोच्या वाटेत येणारी सगळी विघ्नं सरली, वेगवेगळे वाद (तात्पुरते) टळले, सत्ताधारी-विरोधकांनी हट्ट सोडले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि आपली मुंबई `मेट्रोसिटी` झाली. आता दुपारी एक वाजल्यापासून ही नवी लाइफलाइन मुंबईकरांना घेऊन धावणार आहे.
मेट्रोच्या उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल अंबानींच्या पत्नी टीना अंबानी या उद्घाटनाला उपस्थित होते. विशेष म्हणजे रुपाली चव्हाण या महिलेनं मेट्रोचं सारथ्य केलं. सर्वांनी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोनं प्रवास केला. त्यानंतर घाटकोपरला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.
मेट्रोच्या दराबाबत सुरू असलेला वाद उद्या सुनावणीनंतर संपण्याची शक्यता आहे. मुख्य़मंत्री म्हणाले की, निविदा काढली गेली तेव्हाच मेट्रोचे तिकीटदर हे सामान्यांसाठी असावेत असं मांडण्यात आलं होतं. आता या दरांबाबत रिलायंस आणि राज्य सरकार कोर्टात आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.