मुंबई : शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजवलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले.
मात्र शिवस्मारकाच्या भूमीपूजनावेळीसुद्धा मोदी आणि उद्धव यांच्यात संवाद काही दिसला नाही. त्यानंतर हे दोन्ही दिग्गज बीकेसीतल्या कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले. भाजप आणि शिवसेनेतला सामना व्यासपीठावर आणि प्रत्यक्ष सभास्थळीही सुरुच होता.
मोदी मोदींच्या घोषणा आणि त्याला शिवसेनेचा वाघ आला या घोषणेनं प्रत्युत्तर देण्यात येत होतं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंसमोरच हे सगळं सुरु होतं. असं सगळं वातावरण तापलेलं असताना सा-यांच्या नजरा या दोघांकडे होत्या. मात्र दोघांच्या नजरा मात्र एकमेंकांच्या दिशेनं फिरल्याच नाहीत.
दोघंही म्हणायला एका व्यासपीठावर होते, तरीही एकदाही दोघांची नजरानजर काही झालीच नाही. जवळपास 2 तास हा कार्यक्रम सुरु होता. अनेक नेत्यांची भाषणंही झाली. मात्र या सगळ्या काळात पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे दोघंही एकमेकांना टाळत असल्याचंच दिसून आलं. त्यामुळे सत्तेत एकत्र नांदणारे मात्र कितने दूर कितने पास आहेत हे दृष्यांमधून स्पष्ट दिसून आलं.