महाराष्ट्रात 'मॅगी'ला क्लीन चीट

 देशभरात मॅगीवर संक्रांत आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगीला चक्क क्लिन चीट मिळालीय. 

Updated: Jun 5, 2015, 08:30 PM IST
 महाराष्ट्रात 'मॅगी'ला क्लीन चीट title=

मुंबई : देशभरात मॅगीवर संक्रांत आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगीला चक्क क्लिन चीट मिळालीय. 

महाराष्ट्र सरकारच्या प्रयोगशाळांमध्ये मॅगीचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 9 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात शिसं आढळलंय. 

 या चाचण्यांमध्ये शिशाचं प्रमाण 0.01 ते 1.40 पीपीएम एवढं आढळलं. 2.5 पीपीएमच्या आत शिशाचं प्रमाण असेल तर ते आरोग्यास अपायकारक नाही, असा खुलासा अन्न व औषध प्रशासनानं केलाय. 
 
 मॅगीचे मुंबईतील 4, ठाण्यातील 4 आणि सांगलीतला 1 नमुना चाचणीत पास झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथून गोळा केलेल्या 6 नमुन्यांचा अहवाल उद्या मिळणार आहे. दरम्यान, देशभरात मॅगी विक्रीवर बंदी घालण्यात आली असताना, महाराष्ट्रात मात्र ती आरोग्याला धोकादायक नाही, असा निष्कर्ष कसा निघाला, याचं कोडं सर्वांना पडलंय.

मॅगीची सर्व उत्पादने तूर्त मागे 
 मॅगीचा वाद उफाळल्यानंतर आठवड्याभरानं नेस्ले कंपनीचे ग्लोबल सीईओ पॉल बुल्के यांनी आज कंपनीची बाजू मांडली... तूर्तास मॅगीची सर्व उत्पादने मागे घेण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. 
 
 ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून या वादातून मार्ग निघावा यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं बुल्के म्हणाले. त्याच वेळी जगभरात मॅगीचा दर्जा समान असून ते सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला. लवकरात लवकर भारतीय बाजारपेठेत मॅगी कमबॅक करेल, असा विश्वासही पॉल यांनी व्यक्त केलाय... 

 
डॉक्टरांनी बेबी फूडचे प्रिस्क्रिप्शन देऊ नये 
मॅगीच्या वादापाठोपाठ नेस्लेच्या उत्पादनांवर देशभर संक्रांत आलीय.. दरम्यान, डॉक्टरांनी बेबी फूड प्रिस्क्रीप्शनवर देऊ नये असं आवाहन केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलंय.. 

बेबी फूड हे औषधी नाही.. त्यामुळं डॉक्टरांनी बेबी फूड घेण्याची सूचना करु नये असं अहिर यांनी म्हटलंय.. तसंच देशभरातील मेडिकलमध्ये नेस्लेचे सॅरेलॅक आणि जॉन्सन एंड जॉन्सनचे साबण ठेवता येणार नाही अशी माहितीही अहिर यांनी दिलीय.. 

नेस्लेच्या उत्पादनांच्या किंमती तपासून पाहिल्या जातील असंही अहिर यांनी सांगितलंय.. दिल्लीसह देशात जेनेरिक औषधी स्टोअर करणार असून आयएमएने त्याची जबाबदारी घेतलीय असं अहिर यांनी सांगितलंय.. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.