मुंबई : राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे. परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.
केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचेच सरकार येणार या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शिवसेनेने हादरा दिलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला एकही अपेक्षित अधिक जागा न देणारा जागावाटपाचा अंतिम प्रस्ताव रविवारी जाहीर केला. शिवसेनेने गेल्या वेळी १६९ जागा लढविल्या होत्या आणि या वेळी आपल्या १८ जागा घटकपक्षांना देत १५१ जागा लढण्याचे जाहीर केले. राज्यातील जनता महायुतीला सत्ता देण्याच्या तयारीत असताना भाजपने कर्मदरिद्रीपणा दाखवू नये. आम्हाला कस्पटासमान लेखाल, तर शिवसेनेचे वाघ तयारच आहेत, असे स्पष्ट उद्धव ठाकरे यांनी केले
त्यानंतर दोन्ही बाजूंकडून दिवसभर बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र कुणीच मागे हटण्यास तयार नसल्याने तोडगा निघणे कठीण झाले. त्यामुळे देशाच्या राजकारणात २५ वर्षे हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर टिकलेली युती वेळप्रसंगी तोडण्याची भाजपकडून भाषा करण्यात येत आहे.
भाजपचा निम्म्या जागांचा आग्रह शिवसेनेने धुडकावून लावल्याने नाईलाजाने युती तोडण्यासाठी भाजपकडून पावले टाकली जाणार आहेत. शिवसेनेला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी ओम माथूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतील असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस हे भेट घेणार आहेत. शिवसेना न झुकल्यास युती तोडण्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, असे भाजपमधील एका सूत्रांनी सांगितले.
राज्यातील भाजप नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची आणि संसदीय मंडळाची बैठक रविवारी रात्री उशिरा झाली. या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, अनंतकुमार, सुषमा स्वराज, राजीव प्रताप रुडी, ओम माथूर उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर भाजपने पत्रकार परिषद घेण्याचे टाळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.