मुंबई : काँग्रेसची सोमवारी पहिली यादी जाहीर होणार तर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचीही आज बैठक होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून उमेदवारी मागितली आहे.
काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याने लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी मुंबईत तशी घोषणा केलीय. मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत काँग्रेसच्या मेळाव्यात दिली.
दक्षिण कराडमधील मुख्यमंत्री समर्थकांनी कोपरखैरणे इथं मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला होता. मुख्यमंत्री पदावरुन काम करताना कराडमध्ये जास्तीत जास्त विकास कामे केली आहेत. बाकीच्या मतदारसंघापेक्षा कराड जवळचा, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक होतेय. शरद पवारांनी ही बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर अद्याप काँग्रेसनं काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचं काय होणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.