www.24taas.com, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई
लोकसभेच्या उमेदवार निवडीसाठी राज ठाकरें यंदा धक्कातंत्राचा अवलंब करणार आहेत.
प्रस्थापित नेत्यांपेक्षा बिगर राजकीय चेह-यांना उमेदवारी देण्याकडे राज ठाकरेंचा कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हा `आप`चाच प्रभाव असल्याचं मानलं जातंय.
आम आदमी पार्टीच्या वाटचालीचं खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही कुतूहल आहे.
देशाच्या राजकारणाचा ढंगच बदलून टाकणा-या आम आदमी पार्टीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना वेगळी वाट धरावी लागलीय.
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मनसेनंही स्थानिक पदाधिका-यांकडून मतदारसंघांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केलीय.
नाशिकमध्ये झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिका-यांशी संवाद साधताना आपल्या मनातल्या लोकसभेच्या उमेदवाराची प्रतिमा मांडली.
कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, कॉर्पोरेट,सामाजिक क्षेत्र, प्रसारमाध्यमे यापैकी एखाद्या क्षेत्रातील मान्यवर असावा. उमेदवार मतदारांसाठी सरप्राईज एलिमेंट असावा.
एकीकडे राज्यातले प्रस्थापित राजकीय पक्ष लोकसभेत आपल्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी मंत्र्यांना आणि आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मनसेच्या उमेदवार निवडीचा निकष थोडा धाडसीच मानावा लागेल.
आगामी लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवून देणार आहे.
राजकीय पक्षांकडे पाहण्याची नवी दृष्टी आपनं मतदारांना दिलीय. त्यामुळंच गेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी लेखी परीक्षेचं सूत्र राबवणारे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला राबवण्याच्या तयारीत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.