मुंबई : अखेर शीनाच्या हत्येच्या कबुली जबाबावर इंद्राणी मुखर्जीने मोहर लावलीये. 'हो मीच केली शिनाची हत्या' अशा शब्दांत अखेर इंद्राणीने हत्येची कबुली दिलीय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीनाची हत्या केल्याची अखेर इंद्राणीनं कबुली दिलीय. ही कबुली देन दिवसांपूर्वी इंद्राणीने दिली होती. याआधी, गेल्या १० दिवसांपासून ती वारंवार आपला जबाब बदलत होती. अखेर अधिकृतरित्या इंद्राणीने शीनाची हत्या केल्याचं मान्य केल्यानं पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय. तब्बल ५ तास इंद्राणी आपला हा कबूली जबाब देत होती. इंद्राणीच्या या कबुली जबाबामुळे पोलिसांची न्यायालयातील बाजू आता भक्कम झालीय.
इंद्राणीचा कबूली जबाब
इंद्राणीने 'शीना आणि मिखाईलमुळे मी खूप डिप्रेस्ड होती. ते माझ्या प्रगती आड येत होते. ती माझी मुलं होती पण, त्यांच्यामुळे नेहमी मला नेहमी मागे रहावं लागतं होतं... पीटरशी लग्न करुन आणि यशाची शिखरे गाठून मी माझा भयानक भूतकाळ मिटवला होता... तोच ते पुन्हा माझ्या आयुष्यात आले. आले ते आले पण, त्यांनी मला अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. माझ्या आयुष्यात जे घडत होतं त्याच वाटेवर शीना होती. म्हणून मी तिला संपवलं... मी शीनाला मारले नसते तर एक दिवस माझ्यावरच मरण्याची वेळ आली असती' अशी कबुली इंद्रानीनं दिलीय.
अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत...
'माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि व्यक्ती हा माझ्या मर्जीप्रमाणे वागला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती. पण शीना तसं करत नव्हती. राहुलशी तिचे संबंध मला कधीच आवडले नव्हते... मी शिनाला राहूलपासून दूर ठेवण्याचा खूर प्रयत्न केला. पण, शीना जास्तच राहुलच्या जवळ जाऊ लागली होती. 'मी शीनाचे आयुष्य खराब केले... तिचे बालपण खराब केले' असे आरोप नेहमी ती माझ्यावर करायची. कित्येकदा या मुद्द्यांवरुन आमच्यात भांडणेदेखील झाली. शेवटी ती वेगळी राहू लागली. तिच्या येण्याने आणि वागण्यामुळे माझ्या सोसायटीत मला टोमणे खावे लागले... जे टोमणे मी आयुष्यभर खाल्ले ते पुन्हा नको होते... आणि शीनामुळे तेच पुन्हा होत होतं. पीटरशी माझा संसार तर शीनाला अजिबात पटत नव्हता. शिनामुळे पीटर आणि माझ्यात खूप दुरावा निर्माण झाला होता. पीटरशी लग्नाआधी मी जे भोगलंय ते पुन्हा मला भोगायचं नव्हतं. शीना आणि राहुलच्या संबंधांमुळे पीटरदेखील कमालीचे नाराज होते. त्यामुळे आमच्यात अनेकदा भाडंणेही झाले. मला ही रोजची भांडणं नको होती. म्हणून मी शिनाला संपवलं...' असा कबुलीजबाबच इंद्राणीनं दिल्यानं पोलिसांचं काम आता सोप्पं झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.