एसटीची ५.८८ टक्क्यांनी भाडेवाढ!

महागाईचा सामना करताना नाकेनऊ आलेल्या सर्वसामान्यांवर ऐन सणासुदीच्या काळात एसटीने प्रवाशांच्या खिशावर बोजा टाकला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने आज एसटी भाड्यात ५.८८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 26, 2012, 09:28 AM IST

www.24taas.com,मुंबई
सर्वसामान्यांचा लाल डबा आता महाग झाला आहे. डिझेल दरवाढीचे कारणपुढे करत एसटीने भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा सामना करताना नाकेनऊ आलेल्या सर्वसामान्यांवर ऐन सणासुदीच्या काळात एसटीने प्रवाशांच्या खिशावर बोजा टाकला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने आज एसटी भाड्यात ५.८८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
एसटीची भाडेवाढ २७ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीमुळे आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने मांडला होता. त्याबाबत राज्य परिवहन प्राधिकरणाकडे बैठक झाली. त्यात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
राज्याचा ग्रामीण भाग पूर्णपणे एसटीवर अवलंबून असल्याची जाण ठेवून या भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न एसटीकडून करण्यात आला आहे. साध्या, जलद आणि रातराणी सेवेच्या पहिल्या ९ किलोमीटर प्रवासासाठी तर निमआराम सेवेच्या पहिल्या ६ किलोमीटर प्रवासासाठी दरवाढ करण्यात आलेली नाही.
शहरी सेवेत सुमारे १ ते ४ रुपयांची वाढ होणार आहे. २६ सप्टेंबरपर्यंत आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडून फरक वसूल केला जाणार नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

वातानुकूलित सध्या (रु.) नवीन (रु.)
दादर-पुणे रे. स्टेशन (शिवनेरी) ३४0 ३५५
दादर-पुणे स्टेशन (शीतल निमआराम) २४५ २६0
ठाणे-स्वारगेट (पुणे) (शिवनेरी) ३४0 ३५५
बोरीवली-स्वारगेट (पुणे) (शिवनेरी) ४१५ ४३५
मुंबई-नाशिक (शीतल निमआराम) २८१ २९८