मुंबई : कोणकोणते जिल्हे नव्याने उद्याला येतील, आपला तालुका याच जिल्ह्यात हवा, नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. तर कुणाला किती फायदा या सर्व चर्चा आता बंद होणार आहेत.
कारण भाजपा, शिवसेना सरकार २२ जिल्ह्यांची निर्मिती करणार अशा बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहे, नजीकच्या काळात एकही नवीन जिल्हा निर्माण होणार नाही, असं महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.
कारण तसे करणे आर्थिक दृष्टीने परवडणारेही नाही असे आता समोर आले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे या दोघांनीही असा कोणताही प्रस्तावच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२२ जिल्हे आणि ५७ तालुके निर्माण करण्यात येतील अशी बातमी कोठून आली, याचा वरिष्ठ पातळीवर शोध घेतला गेला आहे. राज्यमंत्री दादा भुसे आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्यांची निर्मिती करण्यावर चर्चा झाली. आघाडी सरकारच्या काळात २२ जिल्हे आणि ५७ तालुक्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव आले होते.
त्या आधारावर राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आणि पहाता पहाता कागदावरच सरकारने २२ जिल्हे तयार करुन टाकले. अशी माहिती खात्री न करता माध्यमांना देण्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.