मुंबई : मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
या आरोपीचं नाव अमित रवि राठोड असं असून तो केवळ २० वर्षांचा होता. घरफोडीच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली मुलुंड पोलिसांनी त्याला २९ तारखेला अटक केली होती. तीन तारखेपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
रविवारी, रात्री साधारणत अडीच वाजल्याच्या दरम्यान या आरोपीने पोलीस कोठडीतच आपल्या आयुष्याचा शेवट केला. कोठडीतल्या शौचालयात जावून अंगातील शर्टाने गळफास लावून घेतला.
हा प्रकार काही पोलिसांच्या लक्षात आल्यावर तत्काळ त्याला नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेत आरोपीने आत्महत्या का केली? याची माहिती अजून मिळाली नसून या घटनेचा संपूर्ण तपास क्राइम ब्रांच करीत आहे.