www.24taas.com,चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.
आपण जनमताच्या बाजूनं राहायचं, की जिल्ह्यातल्या लिकर लॉबीच्या बाजूनं याचा निर्णय आता सरकारला घ्यायचा आहे. ही सरकारची एक प्रकारची अग्नीपरीक्षा असल्याचं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलंय.
श्रमिक एल्गार संघटनेच्या नेतृत्वात २०१० पासून सुरू असलेल्या आंदोलनाला आश्वासनांशिवाय काहीही मिळालेलं नाही. एकीकडे जनमताचा रेटा असतानाच सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसची भूमिका नेहमीच दारुबंदीच्या बाजूनं राहिल्याचं बंग यांनी या मुलाखतीत अधोरेखित केलं. झी २४तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत बंग यांनी व्यक्त केलेली ही भावना सगळ्या चंद्रपूर जिल्ह्याची आहे. मात्र हा निर्णय वाटतो तितका सोपा नाही. चंद्रपूर जिल्हा किती रुपयांची किती दारू रिचवतो, मोठ्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे.
सरकारला इतका महसूल मिळत असला, तरी लोकभावना मात्र दारूबंदीच्या बाजूनंच असल्याचं वारंवार सिद्ध झालंय. चंद्रपूरच्या दारुबंदीबाबत एका महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. डॉक्टर अभय बंग म्हणतात, तसं हे महाराष्ट्र राज्य आहे, की मद्यराज्य याचाच निर्णय होणार आहे. तसंच राज्यात लोकशाही सरकार आहे की लॉबिंगपुढे झुकणारं दुबळं सरकार, हेदेखील महिन्याभरात ठरणार आहे.