आतापर्यंत 5 वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ चा इतिहास?

Republic Day 2025 Marathi News: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये का तिरंगा आत्तापर्यंत पाचवेळा बदलण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 22, 2025, 02:14 PM IST
आतापर्यंत 5 वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ चा इतिहास? title=
Republic Day 2025 National flag changed 5 times so far history of National flag

Republic Day 2025 Marathi News: 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी सोसायटी, शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.  देशातील प्रत्येक नागरिकांचं तिरंग्यावर प्रेम आहे. पण तुम्हाला आपल्या तिरंग्याचा इतिहास माहितीये का?

तिरंगावर त्याच्या नावाप्रमाणेच तीन वेगवेगळ्या रंग आहेत. या प्रत्येक रंगाचा अर्थ आहे. तिरंगावर सर्वात वर केशरी रंग आहे ज्याचा अर्थ देशाचे ताकद आणि धैर्य दर्शवतो. तर, तिरंग्यावर पांढरा रंग शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. तर हिरवा रंग ऐश्वर्य आणि समृद्धी दर्शवतो. तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोक चक्रासारखे आहे. चक्राला 24 आरे आहेत. अशोकचक्र गतीचे द्योतक आहे.

सध्या अस्तित्वात असलेला तिरंगा ध्वज 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत स्विकारण्यात आला. तेव्हापासून हाच तिरंगा आहे.  मात्र, यापूर्वी पाच वेळा भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे स्वरुप बदलण्यात आलं आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती. 

स्वातंत्र्यापूर्वी 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक कौलकाता येथे पहिल्यांदा ध्वज फडकावला होता. तेव्हा या ध्वजात हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची पट्टी होती. हिरव्या रंगाच्या पट्टीवर कमळ होतं. तर पिवळ्या रंगात चंद्र-सूर्याची प्रतिमा होती. 

काही जाणकाऱ्यांच्या मते 1907 मध्ये दुसरा झेंडा फडकावला होता. पहिल्या ध्वजातील रंगाप्रमाणे होते. मात्र डिझाइनमधील थोडा बदल होता. मात्र वरच्या पट्टीत केवळ एक कमळ आणि सात तारे होते. 

देशाचा तिसऱ्या ध्वज अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 1917 मध्ये एका आंदोलनादरम्यान फडकावला होता. या ध्वजावर 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या. यात सात तारे, डाव्या आणि वरच्या बाजुस युनिअन जॅक आणि एका कोपऱ्यात पांढरा चंद्रकोर आणि तारा होता. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात चौथा ध्वज फडकावला होता. तो महात्मा गांधींना दिला होता. हा झेंडा लाल आणि हिरव्या रंगाने बनवला होता. नंतर महात्मा गांधींच्या सूचनेनुसार त्यात पांढऱ्या रंगाची पट्टी जोडण्यात आली आणि मध्ये एक चरखा जोडण्यात आला. 

पाचवा झेंडा 22 जुलै 1947 रोजी संविधान बैठकीत भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. यात एक बदल करण्यात आला तो म्हणजे चरखाऐवजी धम्मचक्र ठेवण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हाच तिरंगा देशांत अभिमानाने फडकत आहे.