अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर
आणखी एका गुंडाचा जमावाने खून केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान तालुक्यात घडली आहे. कन्हान तालुक्यातील सत्रापुर परिसरातील मोहनीश रेड्डी नावाच्या गुंडावर आज सकाळी गावातीलच लोकांनी राहत्या घरी त्याच्यावर हल्ला करून जीवानिशी मारलं.
रेड्डीवर खुनाचा प्रयत्न करणं, मारहाण करणं, धमकी देणं या सारखे अनेक गुन्हे कन्हान पोलीस ठाण्यात दाखल होते.
जमिनीचा व्यवसाय करणारा मोहनीश रेड्डी हा मुळातच गुंड प्रवृत्तीचा होता. मोहनीशच्या गुंडगिरीमुळे त्या भागातील रहिवासी त्याच्या धाकात तर होतेच, पण त्याच्याबद्दल रागही त्यांच्या मनात होता. त्याच भागात राहणाऱ्या गारुडी समाजाच्या काही जणांसोबत मोहनीशचं जुनं वैर होतं.
त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. दोनच दिवसापूर्वी हा वाद पुन्हा पेटला आणि चिडलेल्या पात्रे समाजानं जमवासोबत मोहनीशच्या घरावर हल्ला केला. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात मोहनीशने आपल्या पिस्तुलातून गोळीबार केला..
मोहनीशला वाचवण्याकरता त्याची आई, भाऊ, बहिण आणि पत्नी पुढे सरसावले. पण त्यांना देखील यात मारहाण झाली. मोहनीशला कन्हानच्या खाजगी रुग्णालयात नेलं. पण तिथं त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी २ जणांना अटक केलीय. तसंच जमावाने मोहनीशला मारलं नसल्याचं दावा पोलिसांनी केलाय. नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकर किंवा कन्हानच्या मुख्य रस्त्यावरिल होर्डिंगमधील मोहनीशचा हा फोटो त्याचे राजकीय आणि गुन्हेगारांशी संबंध सहज स्पष्ट करतात.
या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पण कायदा हातात घेण्याची समाजाला किंवा जमावाला गरज का पडते याचा देखील विचार पोलिसांसह सर्वानीच करण्याची गरज आहे.
नागपूरमधल्या यापूर्वीच्या हिंसक घटना
१) *१४ एप्रिल १९९८ *वैशाली नगर *गफ्फार डॉन - जाळून मारले, *महिलांची छेड आणि बलात्कार
२) *१७ जुलै १९९९ *पंचशीलनगर *बबलू - जमावाकडून सामुहिक हत्या, *खंडणी घेणे
३) *डिसेंबर १९९९ *वैशालीनगर *रणजीत डहाट - जाळून मारले, *बलात्कार, हत्या, खंडणी घेणे
४) *१३ ऑगस्ट २००४ *कोर्टात *भारत यादव (अक्कू यादव) - जमावाने कोर्टात मारले, *बलात्कार, महिलांना त्रास
५) *१२ ऑक्टोबर २००४ *खरबी *फहीम आणि नईम खान - जमावाने दगडांनी ठेचले, *खंडणी वसूल करणे
६) *९ ऑक्टोबर २०१२ *वसंतराव नाईक झोपडपट्टी *इक्बाल शेख - दगडांनी ठेचले, *जुगार अड्डा, बलात्कार, महिलांना त्रास
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.