www.24taas.com, नाशिक
नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय. प्रशासन लक्ष देत नसल्यानं अखेर संतप्त नाशिककर आज रस्त्यावर उतरले.
हंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महिला गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येला तोंड देतायत. उपमहापौर सतीश कुलकर्णी यांचाच हा प्रभाग.. मुळात इथे पाणीपुरवठा कमी होतोय आणि तोही कमी दाबानं. वारंवार तक्रार करुनही कुणीही दखल घेतली नाही. या मोर्चाला हटवण्यासाठी पोलीस पोहोचले पण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एक- दीड तास पोहचलेच नाहीत. जेव्हा पोहोचले तेव्हा नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा उपदेशाचा डोस पाजून निघून गेले. अखेर उपमहापौर आणि स्थानिक नगरसेविका आल्यानंतर महिलांनी त्यांनाही घेराव घातला आणि तक्रारींचा पाढा वाचला.
पाण्याचं नियोजन कोलमडल्याचा दावा उपमहापौर करत असून पाणी पुरवठ्याचं फेर नियोजन करण्याची गरज उपमहापौरांनीही व्यक्त केलीय. पाणीकपातीनंतर नाशिककरांच्या भरपूर तक्रारी येत आहेत. मात्र प्रशासन त्या गांभीर्यानं घेत नाही. नागरिकांचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनानं घाईघाईनं टँकरमधून पाणी पुरवायला सुरुवात केली. आणि पाण्याचा प्रश्न आठ दिवसांत निकाली लावण्याचं आश्वसन दिलंय. आता हे आश्वासन पाण्यात गेलं, तर पुन्हा पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नाशिककरांनी दिलाय.