www.24taas.com, मुंबई
इंडियन ग्रांपीच्या आयोजनामुळे बुद्ध सर्कीटच्या रूपात भारताला पहिला ‘इंटरनॅशनल फॉर्म्यूला वन’चा ट्रॅक लाभला. ग्रेटर नोएडा इथं असलेल्या या एफ वन ट्रॅकमध्ये यावर्षी काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे यावर्षीदेखील ‘एफ वन’ ड्राईव्हर्ससाठी इंडियन ग्रांपी हे नवं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
वर्षभरापूर्वी ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्कीटवर भारतात एफ वन वेगाचं भन्नाट आगमन झालं. प्रत्येक चॅम्पियन ड्राईव्हर या ट्रॅकवर स्वत:ला सिद्ध करताना आणि आपल्यातील गुणवत्तेच दर्शन घडवताना दिसला. वेगाच्या या दिग्गजांना ‘फॉर्मूला वन’चा हा ट्रॅक पसंद पडला होता. आता दुसऱ्या सीझनसाठी बुद्ध सर्किटची तयारी सुरू आहे. म्हणूनच ट्रॅकचं स्वरूपही काहीस बदलेल दिसतंय.
बुद्ध सर्कीट ट्रॅकच्या आसपास जी धूळ आणि माती दिसत होती त्या जागेवर आता हिरवळ पसरलेली दिसतेय. ट्रॅकच्या काही वळणांमध्येही काही बदल करण्यात आलाय. ट्रॅकच्या टर्न आठमध्येही बदल करण्यात आलाय. या टर्नवर गेल्या वर्षी फेलिपे मासाचा अपघात झाला होता. टर्न ६, ७, ८ आणि ९ च्या कर्ब्सची लांबी पाच मीटरवरून वाढवून १५ मीटर करण्यात आलीय. जेणेकरून ड्राईव्हर्सना परतताना अधिक वेळ लागणार नाही. टर्न १० आणि ११ वर ५.१२ मीटरच्या ‘रन ऑफ एरिया’ला एस्ट्रो टर्फसह एक मीटर अधिक वाढवण्यात आलंय.
बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर करण्यात आलेले बदल स्पष्ट दिसून येताहेत. यावेळी एफ-वनकडे अधिक दर्शकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच यावेळी केवळ दर्शकांसाठी असलेल्या पार्किंगच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली आहे. एकूणच काय तर यावेळी इंडियन ग्रांपी नव्या स्वरूपात आणि नव्या रंगात रेस आणि दर्शकांसाठी सज्ज झालीय. यामुळे थरारामध्येही नक्कीच वाढ होईल.